काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप
मुंबई 1 जून 2017/AV News Bureau:
मुंबई- नागपूर समृध्दी मार्ग हा भ्रष्टाचाराचा महामार्ग बनल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज केला.
राज्यभरातील शेतक-यांमध्ये मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गाबद्दलचा असंतोष आणि या महामार्गाच्या टेंडर प्रक्रियेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्य रस्ते विकास महामंडळाकडून स्पष्टीकरण मागण्याकरिता काँग्रेस नेते सचिन सावंत यांच्यासमवेत काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिका-यांच्या शिष्टमंडळाने राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात विश्वनाथ पाटील, राजन भोसले, डॉ. राजू वाघमारे, पृथ्वीराज साठे आदी काँग्रेस नेते सहभागी होते.
राज्याच्या समृध्दी महामार्गाच्या माध्यमातून अपेक्षा होती की “सबका साथ सबका विकास” साध्य होईल. पण राज्य सरकारच्या माध्यमातून “कुछ का साथ कुछ का विकास” हेच धोरण राबविले जात आहे. या सरकारचा उद्देश हा विकास नसून त्यातून भ्रष्टाचार करणे हाच असल्याचे दिसून येते. 2 जानेवारी 2017 च्या टेंडरची मुदत 29 मार्च रोजी संपत असताना मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात 7 मार्च रोजी बैठक बोलावून टेंडर प्रक्रियेच्या अटी व शर्ती बदलण्याचे आदेश दिले व त्यातून टेंडर भरण्याच्या शेवटच्या दिवशी नविन अटी व शर्तींसह टेंडर बदलण्यात आले. पुन्हा या नविन टेंडर प्रक्रियेत देखील 16 मे रोजी बदल करण्यात आला यातून काही निवडक ठेकेदारांना काम मिळावे याचकरिता हे बदल करण्यात आले असा आरोप सावंत यांनी केला.
नवीन टेंडरची 31 मे रोजी संपणारी मुदत आणखी 5 दिवस वाढवण्यात आलेली आहे, हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असून यामध्ये आर्थिक लागेबांधे गुंतले आहेत असा आरोप सावंत यांनी केला आहे.