महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांची कारवाई
नवी मुंबई, 30 मे 2017/AV News Bureau:
पदपथांवर फेरीवाल्यांना बसण्यास मदत केल्याप्रकरणी आणि फेरीवाल्यांना कारवाईच्या आगावू सूचना दिल्याचा ठपका ठेवत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आज बेलापूर विभाग कार्यालयातील दोन कर्मचा-यांना निलंबित केले.
नागरिकांची कामे योग्य रितीने विहित वेळेत व्हावीत आणि हे करताना महापालिका अधिकारी – कर्मचारी यांनी कार्यालयीन शिस्तीचे पालन करावे असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी कर्मचा-यांना दिले होते. या अनुषंगाने कामात निष्काळजीपणा करणा-या महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे. बेलापूर विभाग कार्यालयातील वरिष्ठ लिपिक राजेश सखाराम राऊत व वाहनचालक शशिकांत शांताराम ठाकरे यांना निलंबित करण्यात आले आहे. कामात निष्काळजीपणा करीत रस्ते आणि पदपथांवर फेरीवाल्यांना बसण्यास मदत करणे आणि फेरीवाल्यांना कारवाईच्या आगावू सूचना देत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी कामात कुचराई केल्याचा ठपका ठेवत या दोन कर्मचा-यांच्या विरोधात ही शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात आली आहे.
माजी पालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगलेच सरळ केले होते. मात्र त्यांची बदली झाल्यानंतर महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी सुस्तावल्याचे चित्र सध्या महापालिकेत दिसत आहे. यापार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त रामास्वामी यांनी कामात कुचराई करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.