क्रीडा मंत्री विजय गोयल
नवी दिल्ली, 29 मे 2017:
सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना पाकिस्तान पाठबळ देण्याचे थांबवत नाही, तोपर्यंत पाकिस्तानसोबत भारताचा क्रिकेट सामना होवू शकत नाही, असे केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी आज स्पष्ट केले.
सध्याच्या परिस्थितीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या क्रिकेट मालिका आयोजित करण्यासारखे वातावरण नाही. एकाचवेळी दहशतवाद आणि क्रिकेट शक्य नसल्याचेही गोयल यांनी स्पष्ट केले.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर येणार असल्यामुळे भविष्यात दोन्ही देशांमध्ये दिर्घकाळापासून थांबलेले क्रिकेट सामने पुन्हा सुरू होण्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी भविष्यात सामने आयोजित करण्यापूर्वी केंद्र सरकारशी चर्चा करावी, असेही गोयल म्हणाले.
गेल्या काही वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. सीमेवरून होणारी घुसखोरी, दहशतवादी कारवाया यांना पाकिस्तानकडून पाठींबा मिळत आहे. त्यामुळे जोपर्यंत दहशतवादाला पाठिंबा देण्याचे पाकिस्तान थांबवत नाही, तोपर्यंत त्यांच्यासोबत क्रिकेट खेळणार नाही, असे गोयल यांनी स्पष्ट केले.