भिवंडी काँग्रेसकडे तर मालेगावात त्रिशंकू

पनवेलमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत

भिवंडी,नाशिक, 26 मे 2017/AV News Bureau:

पनवेलमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवलेली असतानाच भिवंडी-निजामपूर महापालिकेत मात्र भाजपला थोडा धक्का बसला आहे. काँग्रेसने भिवंडीत स्पष्ट बहुमत मिळवत पुन्हा एकदा सत्ता काबीज केली आहे. तर मालेगावात मात्र एकाही पक्षाला बहुमताचा आकडा गाठता न आल्यामुळे तेथे त्रिशंकू अवस्था आहे.

पनवेल महापालिकेच्या 78 जागांसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीत भाजप-रिपाइने 51 जागा पटकावत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर शेकापला 23 आणि काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी 2 जागांवरच समाधान मानावे लागले आहे.

भिवंडी निजामपर महापालिकेच्या 90 जागांसाठी मतदान झाले होते. या महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपसह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. देशात आणि राज्यात भाजपची लाट असताना भिवंडीत मात्र त्यांना धक्का बसला आहे. 90 जागांपैकी काँग्रेसने 47 जागा पटकावल्या आहेत. तर भाजपाला 19 ,शिवसेनेला 12 जागा मिळाल्या आहेत. याशिवाय रिपाइला आणि कोणार्क विकास आघाडीला प्रत्येकी 4 तर समाजवादी पक्ष आणि अपक्षांना प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला भिवंडीत आपले खातेही उघडता आलेले नाही.

नाशिकमधील मालेगाव महापालिकेच्या 84 जागांसाठी मतदान झाले होते. काँग्रेसने 28 जागा पटकावल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसने 20, शिवसेनेने 13 जागांवर विजय संपादन केला आहे. याशिवाय भाजपनेही 9 जागा जिंकल्या असून एमआयएमनेही 7 जागा मिळवल्या आहेत. जनता दलानेही 6 जागांवर विजय मिळवला आहे. मात्र कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे महापालिकेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरमध्ये आघाडी झाली होती. त्यामुळे आता सत्ता स्थापनेसाठी कोणते पर्याय पुढे येतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.