नवी मुंबई महापालिका आयुक्तांकडून पावसाळीपूर्व कामांचा आढावा
नवी मुंबई, 25 मे 2017/AV News Bureau:
नवी मुंबई शहरातील पावसाळीपूर्व कामांचा विभागनिहाय आढावा आज महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी घेतला. 30 मे पर्यंत पावसाळापूर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले.
विभाग अधिकारी व कार्यकारी अभियंता आणि संबंधित अधिका-यांनी दररोज सकाळ-संध्याकाळ आपापल्या विभागातील कामांची प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा नियमित अहवाल सादर करावा असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. 30 मे पर्यंत नालेसफाई व गटारे सफाईची कामे पूर्ण झाली पाहिजेत यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. सफाईनंतर बाहेर काढून ठेवण्यात येणारा गाळ 1-2 दिवसात सुकल्यानंतर लगेच उचलण्यात यावा आणि हा गाळ पावसाळी कालावधीत पुन्हा वाहून नाल्यांमध्ये येणार नाही अशाप्रकारे त्याची योग्य जागी विल्हेवाट लावावी अशीही सूचना केली.
रस्त्यांवर सुरू असलेली खोदकामे लगेच बंद करून रस्त्यांच्या पुनर्पृष्ठीकरणाची कामे तसेच रस्त्यांवरील खड्डे दुरूस्तीची कामे 30 मे पर्यंत पूर्ण करण्यात यावीत असे त्यांनी निर्देशित केले. वाहतुकीला अडथळा येणा-या वृक्षांच्या फांद्या छाटण्याची कामेही त्वरीत पूर्ण करावीत असे त्यांनी सांगितले.
पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणी विशेष लक्ष देऊन तेथे मोटार पंपची व्यवस्था करून ठेवावी तसेच दरड कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणांवरून आवश्यकतेनुसार माणसे स्थलांतरीत करणेबाबत निर्णय घ्यावा अशाही सूचना त्यांनी दिल्या. शहराचे कवच असणा-या होल्डींग पाँडस् च्या फ्लॅपगेटस् ची आवश्यक दुरूस्ती त्वरीत पूर्ण करावी तसेच धोकादायक इमारतींची यादी लवकर प्रसिध्द करावी अशीही सूचना आयुक्तांनी केली.