मुंबई, 25 मे 2017/AV News Bureau:
जागतिक वारसा लाभलेल्या घारापुरी लेण्यांना महावितरणमार्फत विद्युत पुरवठा करण्याच्या दृष्टीने काम सुरु आहे. चारही बाजूने समुद्राने वेढलेल्या या बेटास ‘मरीन केबल’द्वारे(समुद्रा खालून) वीज पुरवण्यात येणार असून अशाप्रकारचा प्रयोग राज्यात प्रथमच होत आहे.
महावितरणचे अध्यक्ष संजीव कुमार यांनी याबाबत नुकतीच घारापुरी बेटाला भेट देवून प्रकल्पाची पाहणी केली. कुमार यांनी समुद्रा खालून टाकण्यात येणारी केबल व त्याची यंत्रणा, घारापुरी बेटावर बसवण्यात येणारे तीन ट्रान्सफॉर्मर व त्यांचे ठिकाण, बेटावरील वीज वितरणाचे जाळे आदींची पाहणी केली.
महावितरणमार्फत न्हावा येथील टी.एस.रेहमान या अंतिम टप्प्यात असलेल्या सब-स्टेशन मधून घारापुरी बेटास वीज पुरवठा करण्यात येणार आहे. याकरता समुद्रा खालून सात किमी. लांबीच्या चार वीज वाहिन्या टाकण्यात येत आहेत. या वाहिन्यांतून २२ केव्हीचा वीज पुरवठा घारापुरी बेटास करण्यात येणार आहे. आतापर्यंत सुमारे दोन किमी लांबीची केबल टाकण्यात आली असून उर्वरित कामही लवकरच पूर्ण होणार आहे.
या प्रकल्प पाहणी दौऱ्यात महावितरणचे संचालक (प्रकल्प) दिनेशचंद्र साबू, भांडुप नागरी परिमंडळचे मुख्य अभियंता (प्रभारी) राहुल बोरीकर, वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर मानकर हे उपस्थित होते.