रोहा तालुक्यात लगोरीची स्पर्धा
रायगड, 25 मे 2017/AV News Bureau:
महाराष्ट्र लगोरी संघटना आणि रायगड जिल्हा लगोरी संघटनेतर्फे रोहा तालुक्यातील वरसे येथील एम. बी. पाटील मैदानावर राज्यस्तरीय लगोरी स्पर्धा पार पडली. लगोरीचे जनक संतोष गुरव यांच्या जयंतीनिमित्त ही स्पर्धा घेण्यात येते. यंदा या स्पर्धेचे सातवे वर्ष असून पुरुष गटात रायगड तर महिला गटात अहमदनगरच्या संघांनी विजेतेपद पटकावले.
१८ जिल्ह्यातील ३०० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत मुलांच्या गटात अंतिम सामन्यात रायगड संघाने नवी मुंबई संघाचा २२ – ०, ३ – ३ आणि १० – ६ गुणांनी पराभव करीत अजिंक्यपद मिळविले. तृतीय क्रमांक भंडारा आणि चतुर्थ क्रमांक ठाणे संघाने मिळविला. मुलींच्या गटात अहमदनगरच्या संघाने पुणे संघाचा १० – ०८, १० – ०१ गुणांनी पराभव करीत अजिंक्यपद मिळविले. तृतीय क्रमांक रायगड आणि चतुर्थ क्रमांक अकोला संघाने मिळविला. पहिल्यांदाच ही स्पर्धा मॅटवर खेळवली गेली.
संतोष गुरव यांच्या जयंतीचे औचित्य साधून क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भारतातील खेळाडूंना संतोष गुरव क्रीडा रत्न अवॉर्ड चालू करण्यात आला असून या कार्यक्रमात सदर पुरस्कार रायगडमधील सात वर्षाची असताना खाडी पार करणारी मृणाल महाजन आणि एव्हरेस्ट सर करणारा तेलंगणातील लगोरीचा खेळाडू अंगोथ तुकाराम यांना जाहीर करण्यात आला.