नागभीड, नेवासा, रेणारपूर, शिराळा आणि धारणीतही मतदान
मुंबई,24 मे 2017/A News Bureau:
पनवेलसह भिवंडी- निजामपूर, मालेगाव महानगरपालिका तसेच धारणी पंचायत समिती, नागभीड नगरपरिषद आणि नेवासा, रेणापूर व शिराळा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक; तसेच विविध 7 नगरपरिषदांतींल 11 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.
सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 26 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
तिन्ही महानगरपालिकेच्या एकूण 252 जांगांसाठी 1 हजार 251 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण 12 लाख 96 हजार 026 मतदारांसाठी 1 हजार 730 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यक तेवढी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यात 2 हजार 291 कंट्रोल युनिट; तर 7 हजार 143 बॅलेट युनिटचा समावेश आहे.
नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान
नवनिर्मित नागभीड (जि. चंद्रपूर) नगरपरिषदेचे अध्यक्ष व सदस्य पदांबरोबरच नेवासा (जि. अहमदनगर), रेणापूर (जि. लातूर) व शिराळा (जि. सांगली) नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे. चारही ठिकाणी प्रत्येकी 17 जागा आहेत. एकूण 68 जागांसाठी 276 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 58 हजार 794 मतदार असून मतदानाची संपूर्ण तयारी झाली आहे. जव्हार, श्रीवर्धन, चिपळूण, कसई-दोडामार्ग, धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु., औसा आणि अचलपूर या 7 नगरपरिषद/ नगरपंचायतींतील एकूण 11 रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठीदेखील मतदान होईल, असे सहारिया यांनी सांगितले.
‘धारणी’तही तयारी पूर्ण
- धारणी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीदेखील आज मतदान होत आहे. एकूण दहा जागांसाठी 32 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 1 लाख 1 हजार 316 मतदारांसाठी 146 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती सहारिया यांनी दिली.