ब्रँड अँबेसेडर नेमून प्रचार करणार –मत्स्यव्यवसायमंत्री
मुंबई,24 मे 2017/AV News Bureau:
मासे खाल्याने आरोग्य चांगले राहते यासाठी प्रचार करण्यात येणार असून मत्स्यउत्पादन व्यवसायात राज्याला अग्रेसर बनविण्यासाठी ब्रँन्ड अँम्बेसिडर नेमण्यात येणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी आज दिली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे झालेल्या पिंजरा पध्दतीने मत्स्यसंवर्धन प्रशिक्षण व कार्यशाळेत जानकर बोलत होते. यावेळी पदुम विभागाचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, मत्स्यव्यवसाय आयुक्त गोविंद बोडके आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
राज्यात एकूण 2,579 जलाशय आहेत. या जलक्षेत्रांचा व्यावसायिक दृष्टीकोणातून वापर करुन राज्याचे मत्स्य उत्पादन व उच्च प्रतीच्या प्रोटीनची उपलब्धता वाढविण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभाग व महाराष्ट्र मत्स्यविकास उद्योग महामंडळ यांच्याकडुन निधी उपलब्ध करुन वेळोवेळी मदत करण्यात येईल, असे जानकर यांनी सांगितले.
- 30 हजार लोकांना रोजगार मिळणार
मत्स्यव्यवसाय उत्पादन वाढीबरोबर मच्छिमारांना प्रशिक्षण देवून सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. या व्यवसायामध्ये युवकाचा सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. राज्यात उपलब्ध असलेल्या जलाशय तलावांच्या जलक्षेत्रापैकी 1 टक्के जलक्षेत्र पिंजरा पध्दतीने मत्स्यपालन करण्यासाठी राखून ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मत्स्यउत्पादन वाढणार असून जवळपास 30 हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
- मत्स्यव्यवसाय प्रोत्साहन देण्यासाठी एक खिडकी
मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत जिल्हास्तरावर अधिकाऱ्याची नेमणूक करुन मत्स्यव्यवसायाशी संबंधित योजना व भागभांडवल उपलब्ध करुन देण्यासंदर्भात मार्गदर्शन केले जाईल. या व्यवसायासाठी लागणारे पेट्रोल आणि रॉकेल संदर्भातही धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असून मत्स्यव्यवसाय उद्योजकाच्या समस्या सोडविण्यासाठी एक खिडकी योजना राबविण्यात येणार आहे.