पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना विश्वास
पनवेल, 21 मे 2017/AV News Bureau:
पनवेल महापालिका निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांनी रोडशोज, प्रचार फेऱ्या आणि रॅलीजच्या माध्यमातून प्रचाराचा धडाका उडवून दिला आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात परिणामकारक प्रचाराचे नियोजनही भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाने केले आहे. त्यामुळे आम्ही पनवेलमध्ये बहुमताचा आकडा सहज गाठू शकू, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांची व्यक्त केला आहे.
पारदर्शक कारभार आणि विकासाच्या मुद्द्यावर पहिल्या टप्प्यातील प्रचारादरम्यान मतदारांपर्यंत पोहोचण्याची महत्वाची मोहिम भाजपचे फत्ते केली. दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेमुळे प्रचारात वेगळीच रंगत निर्माण झाली आहे. परिणामी भाजपा आपल्या मित्र पक्षांच्या साथीने बहुमताचा आकडा सहज पार करुन ५५ जागांच्या आसपास पोहोचेल, असा विश्वास आमदार ठाकूर यांनी व्यक्त केला.
आमच्या उमेदवारांचा लोकांमध्ये असलेला थेट जनसंपर्क, होर्डींग्ज, सोशल मीडिया अशा विविध साधनांच्या माध्यमातून प्रचार करत भाजपाने अतिशय सुसंस्कृतपणे विकासाचे मुद्दे नम्रपणे जनतेपर्यंत पोहोचवले आहेत. आमदारकीच्या माध्यमातून गेली सात आठ वर्षे आपण नियमितपणे जनतेच्या संपर्कात आहोत. त्यामुळे स्पष्ट बहुमत मिळवण्यात भाजपाला कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.