सर्वांगिण विकासासाठी भाजपच्या पाठीशी उभे रहा

जलसंधारणमंत्री राम शिंदे

पनवेल, 20 मे 2017/AV News Bureau:

राज्यातील १३ महानगरपालिका निवडणुकांमध्ये १० महानगरपालिकेत भाजपची सत्ता आली.विरोधकांना आता कळून चुकले आहे कि त्यांची  खैर नाही. म्हणूनच पनवेलमध्ये शेकाप आणि राष्ट्रवादी एकत्र आली असून काँग्रेस त्यांना चिकटली आहे. शेकाप आघाडीत अडचणीत आलेले पक्ष एकत्र असून त्यांच्या हातात सत्ता गेली तर पनवेलकरांना तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागेल. त्यामुळे सर्वांगिण हितासाठी भाजपच्या पाठीशी उभे रहा, असे आवाहन राज्याचे जलसंधारण, राजशिष्टाचारमंत्री राम शिंदे यांनी शुक्रवारी कळंबोली येथे केले. भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते.

यावेळी भाजपचे पनवेल महानगरपालिका निवडणूक प्रभारी नामदार रवींद्र चव्हाण,खासदार हरवंश सिंग,भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड,ज्येष्ठ नेते बाळासाहेब बोरकर,भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत,सरचिटणीस दशरथ म्हात्रे,एकनाथशेठ देशेकर,महेश साळुंखे यांच्यासह भाजप उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते.

पनवेलकरांचे प्रश्न विधानसभेत मुद्देसूद आणि आग्रहीपणे मांडणारे आमदार प्रशांत ठाकूर अभ्यासू आहेत. खारघरच्या टोलनाक्यातून स्थानिकांची सुटका व्हावी यासाठी त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचे धाडस दाखवले. त्यांची मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. योग्य वेळी त्यांनी सरकारला  महापालिका करायला लावली. दूरदृष्टिकोनातून त्यांचा प्रवास काँग्रेस मधून भाजपमध्ये झाला असून पक्षाने त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली असून ते ती यशस्वीपणे पेलत आहेत. प्रशांत ठाकूर यांनी पनवेलच्या विकासासाठी अभ्यासपूर्णरित्या दशसूत्री योजना नागरिकांसमोर दशमान योजना या जाहीरनाम्यातून मांडली आहे. पनवेलचा विकास करण्याची ताकद केवळ केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारमध्ये आहे असे राम शिंदे म्हणाले.

bjp1

या परिसरातील नागरी आणि पायाभूत सुविधांसाठी  सातत्याने सिडकोशी संघर्ष केला. येथील ग्रामीण भाग आणि सिडको वसाहती यांचा विकास केवळ महापालिका झाल्याने होईल या विश्वासाने राज्याचे मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांच्याकडे महापालिकेची मागणी केली. विकासाच्या अजेंडा मतदारंसमोर ठेवला असून पनवेलकरांच्या विकासासाठी भाजपयुती  कटिबद्ध आहे.– आमदार प्रशांत ठाकूर