नवी मुंबई,19 मे 2017/AV News Bureau:
कोकणातील चाकरमान्यांची आवडती दादर-सावंतवाडी-दादर राज्यराणी एक्सप्रेस (11003/11004) आता तुतारी एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणार आहे. महाराष्ट्राचे लाडके कवी केशवसुतांच्या ‘तुतारी’ या गाजलेल्या कवितेवरूनच राज्यराणी एक्सप्रेसचे नवे नाव ठेवण्यात येणार आहे.
कवी केशवसुत यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक संबोधले जाते. मराठी साहित्यात त्यांचे बहुमोल योगदान आहे. केशवसुतांना श्रद्धांजली म्हणून रेल्वे प्रशासनाने त्यांच्या ‘तुतारी’ या गाजलेल्या कवितेवरून राज्यराणी एक्सप्रेसला ‘तुतारी एक्सप्रेस’ हे नवीन नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत येत्या 22 मे रोजी दादरच्या कोहिनूर सभागृहात सायंकाळी 4.30 वाजता हा नामकरण सोहळा होणार आहे.