आमदार प्रशांत ठाकूर यांचा विजयाचा विश्वास
पनवेल, 18 मे 2017/AV News Bureau:
भाजपाला केंद्रात, राज्यात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये जनतेने स्विकारले आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेतही भाजपाचीच सत्ता येणार असून पनवेल शहराचा पहिला महापौरही आमचाच असेल, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला.
केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारने विकासाचे राजकारण केले. आमच्या सरकारने मुंबई आणि आसपासच्या परिसरातील विमानतळ, बंदरे,वाहतूक, मेट्रो आणि रेल्वे व्यवस्था यांच्या सुधारणेवर भर दिला. पनवेलजवळ होत असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ, शिवडी न्हावा-शेवा ट्रान्सहार्बर लिंक, पनवेल रेल्वे स्थानकाचे टर्मिनसमध्ये होणारे रुपांतर, मेट्रो रेल्वेमुळे भविष्यात पनवेल हे मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट सिटी म्हणून विकसित होणार आहे. या सर्व बाबींचा मतदार नक्कीच विचार करतील. त्यामुळे पनवेल महापालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकेल, असा दावा ठाकूर यांनी केला.
पनवेलच्या निवडणुकांना सामोरे जाताना शिवसेनेकडून युतीबाबत प्रतिसाद न मिळाल्याने आम्ही रिपाइं आठवले गटाला सोबत घेत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे जोगेंद्र कवाडे यांच्या गटाचाही बिनशर्त पाठिंबा मिळवण्यात आम्हाला यश आले आहे. त्यामुळे दलित समाजाची एकगठ्ठा मते भाजपाच्या उमेदवारांना मिळणार असल्याचा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला.
केंद्रात आणि राज्यात मित्र पक्षांना सत्तेतील वाटा देण्याचे पक्षाचे धोरण राहीले आहे. त्यामुळे पनवेलमध्येही ते धोरण कायम ठेवून मित्रांनाही सत्तेत योग्य वाटा देण्यात येणार असल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले.
- पारदर्शकतेच्या मुद्द्यावर तडजोड नाही
पारदर्शक कारभार करणे हे भाजपा सरकारचे अधिकृत धोरण आहे. पनवेल महापालिकेचा कारभार करतानाही पारदर्शकतेच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी मतदारांना दिली आहे.
मुंबई महापालिका निवडणूकीआधीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेत पारदर्शक कारभाराचा शब्द मुंबईकरांना दिला होता. पारदर्शकतेच्या अजेंड्यावर मुख्यमंत्री ठाम राहिल्याने प्रसंगी शिवसेनेने भाजपासोबतची युती तोडली होती.विशेष म्हणजे मुंबई महापालिका निवडणूकीत चांगले यश मिळूनही भाजपाने पारदर्शकतेच्या मुद्द्यावर तडजोड न करता सत्तेबाहेर राहणे पसंत केले. त्यामुळे पहिल्या महापालिकेचा कारभार पारदर्शक पद्धतीने करत एक चांगला आदर्श घालून देण्याचा आमचा इरादा असल्याचे ते म्हणाले.
तसेच जनतेच्या सूचना आणि अपेक्षा हा पारदर्शक कारभारातील एक महत्वाचा घटक असल्याचे आम्ही मानतो. त्यामुळे जनतेच्या सुचनांसाठी आम्ही ” आपले शहर,आपला अजेंडा’ हा अभिनव उपक्रम राबविला. या उपक्रमाच्या माध्यमातून आम्हाला असंख्य सूचना प्राप्त झाल्या. त्या सर्व सुचनांचा विचार करून आम्ही जनतेच्या अपेक्षेनुसार जाहीरनामा तयार केला. या जाहीरनाम्यावर खुद्द मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. केंद्रात आमची एकहाती सत्ता असल्याने निर्णय प्रक्रिया आणि त्याच्या अंमलबजावणीत आलेला वेग आपण पाहतोच आहोत. याउलट अनेक पक्षांची एकत्रित सत्ता असल्यास प्रत्येकाचे प्राधान्याचे मुद्दे वेगळे असतात, त्यामुळे प्रशासन आणि निर्णय प्रक्रियेत गोंधळ उडू शकतो, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले.
- प्रशांत ठाकूर यांच्या प्रचार यात्रांना उस्फूर्त प्रतिसाद
भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र आणि राज्य सरकारची गेल्या अडीच तीन वर्षांतील कामगिरी पाहता पनवेल महापालिकेतही भाजपाचा विजय ही निव्वळ औपचारिकता असून प्रचारयात्रांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.
गेले महिना दोन महिने आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल,खारघर,कामोठे आणि कळंबोली आणि महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ग्रामीण भागात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाका लावला. प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावरच आम्ही मतदारांकडे मते मागत असून आमदारांच्या कामावर समाधानी असल्याची प्रतिक्रिया आम्हाला प्रचार फेरीदरम्यान ऐकायला मिळते, अशी प्रतिक्रिया भाजपाचे अनेक उमेदवार व्यक्त करत आहेत.