उल्हासनगर महापालिकेच्या कर्मचाऱ्याला अटक

ठाणे, 18 मे 2017/AV News Bureau:

उल्हानसगर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम विरोधी विभागात काम करणाऱ्या कनिष्ठ लिपिकाला 2 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज अटक केली. संजय प्रभाकर पवार (47) असे या लाचखोर महापालिका कर्मचाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदार पालिकेचेच कर्मचारी असून त्यांना कामावरून निलंबित करण्यात आले होते. या निलंबित कालावधीचा थकीत पगार काढण्यासाठी आणि ड्युटी बदलून देण्याची मागणी तक्रारदाराने केली होती. यावर  अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाचा कनिष्ठ लिपिक संजय प्रभाकर पवार (47) याने तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संजय प्रभाकर पवारविरोधात तक्रार केली.

तक्रारदाराने केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता संजय प्रभाकर पवार याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला आणि तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना संजय प्रभाकर पवारला रंगेहाथ पकडण्यात आल्याची माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांनी दिली.

संजय पवारविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले