मुंबई, 18 मे 2017/AV News Bureau:
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडणाऱ्या हरहुन्नरी अभिनेत्री रीमा लागू Reema Lagoo यांचे आज निधन झाले. त्या 59 वर्षांच्या होत्या. छातीत दुखू लागल्याने त्यांना काल मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अकाली एक्झिटने साऱ्यांनाच धक्का बसला आहे.
मराठी , हिंदी चित्रपटांसह नाटक आणि छोटा पडदाही त्यांनी गाजवला. गेल्या चार दशकांचा त्यांचा चंदेरी दुनियेतील प्रवास आज मध्यरात्री थांबला. हिंदी चित्रपटांमध्ये ग्लॅमरस आई म्हणून त्यांना ओळखले जात असे. मैने प्यार किया, कुछ कुछ होता है, हम आपके है कौन अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांनी आघाडीच्या नायक, नायिकांसोबत काम केले आहे. विशेषतः संजय दत्तच्या वास्तव चित्रपटातील रीमा लागू यांची कणखर आईची भूमिका कमालीची गाजली होती. तर पुरूष या नाटकातील त्यांचे कामाचेही प्रचंड कौतूक झाले.
रीमा लागू Reema Lagooयांचा जन्म 1958 मध्ये झाला. घरातच अभिनयाचे बाळकडू त्यांना मिळाल होते. त्यांच्या आई मंदाकिनी भडभडे यांचं ‘लेकुरे उदंड जाहले’ हे नाटक प्रचंड गाजलं होतं. शालेय शिक्षण सुरू असतानाच रीमा लागू Reema Lagoo यांनी अभिनयाचे धडे घ्यायला सुरुवात केली होती. विवेक लागू यांच्याशी त्यांनी विवाह केला. मात्र काही वर्षानंतर दोघेही वेगवेगळे झाले. सिनेअभिनेत्री मृण्मयी लागू ही त्यांची कन्या.
- रीमा लागू यांचे काही गाजलेले हिंदी सिनेमे
मैंने प्यार किया, हम आपके हैं कौन, हम साथ साथ हैं, कुछ कुछ होता है, वास्तव, साजन, आशिकी, कयामत से कयामत तक.
- दूरदर्शनवरील हिंदी मालिका
श्रीमान श्रीमती, तू तू मैं मैं
- मराठीतील गाजलेली नाटके
चल आटप लवकर, झाले मोकळे आकाश, तो एक क्षण, पुरुष, सविता दामोदर परांजपे, बुलंद, विठो रखुमाय, घर तिघांचं हवं.
- ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांच्या अकाली निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दुःख व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटरवरून लागू यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.