राधाकृष्ण विखे पाटील यांची खोचक मागणी
महाड,17 मे 2017/AV News Bureau:
शिवसंपर्क अभियानामध्ये उस्मानाबाद येथे शेतकऱ्यांच्या कार्यक्रमात तोतया आमदार उभा केला म्हणून शिवसेनेविरूद्ध पोलिसांनी 420 चा गुन्हा दाखल करावा, अशी खोचक मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
शेतकरी कर्जमाफी व हमीभावाच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी सुरू केलेल्या 4 थ्या टप्प्यातील संघर्ष यात्रेचा प्रारंभ बुधवारी सकाळी महाड येथे करण्यात आला. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत विखे पाटील यांनी शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानावर टीका केला. सत्ताधारी भाजप व शिवसेना कर्जमाफीचा निर्णय घेण्याचे कर्तव्य बजावण्याऐवजी यात्रा काढून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनिल तटकरे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आ.प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्यासह विरोधी पक्षांचे आमदार उपस्थित होते.
तत्पूर्वी प्रमुख नेते आणि आमदारांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्यावर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
राज्य सरकारमध्ये दरोडेखोर असल्याचे उद्धव ठाकरे यांनी अकोल्यात सांगितले. हे दरोडेखोरांचे सरकार असेल तर शिवसेनाही त्यात सहभागी असल्याचे त्यांनी विसरू नये. शिवसेनेचे शेतकरी प्रेम, कोकण प्रेम, मंत्र्यांचे राजीनामे अन् शिवसंपर्क अभियान सारे थोतांड आहे. जोपर्यंत शिवसेना शेतकरी कर्जमाफीसाठी मंत्र्यांचे राजीनामे देत नाही, तोपर्यंत त्यांच्या एकाही शब्दावर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही,असे विखे- पाटील म्हणाले.