केंद्रीय मंत्री विजय गोयल
नवी मुंबई, 17 मे 2017/AV News Bureau:
खेळांचा प्रचार आणि प्रसार करणे हे राज्य सरकारचे काम आहे. यासाठी काही दिवसांपूर्वी सर्व राज्यांच्या क्रीडा मंत्र्यांची एक बैठक बोलावण्यात आली होती, त्यामध्ये खेळाला प्राथमिक विषय बनवावा याबाबत चर्चा करण्यात आली. सर्वच राज्यांनी याबाबत सहमती दिली असून त्याबाबतच्या सूचना देण्यासाठी अंतिम अहवाल राज्यांकडे पाठविण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री विजय गोयल यांनी दिली. 17 वर्षाखालील जागतिक फिफा फुटबॉल चषक स्पर्धेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी नवी मुंबईतील डॉ.डी.वाय. पाटील स्डेडियमला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे, डॉ. डी. वाय. पाटील समूहाचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील, नवी मुंबई महापालिका आयुक्त अंकुश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
6 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर दरम्यान हे सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये जगभरातून विविध देशांचे 24 संघ सहभागी होणार आहेत. त्यासाठी 52 सामने होणार आहेत. त्यातील काही सामने डी.वाय. पाटील स्टेडिअमवर खेळवले जाणार आहेत. या सामन्यांसाठीची तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण 51 हजार आसनव्यवस्था नव्याने बसविण्यात येणार आहे. 4 अद्ययावत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ड्रेसिंग रूमची व्यवस्था करण्यात आली आहे. फुटबॉल सामन्यांसाठी मुख्य पिच सोबतच सरावासाठी दोन पिच तयार करण्यात आल्या आहेत. या तयारीबाबत आपण समाधानी असल्याचे मत यावेळी केंद्रीय मंत्री गोयल यांनी व्यक्त केले.
खेळाला अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा मंत्रालयातर्फे टॅलेंट सर्च पोर्टल बनविण्यात येणार आहे. याद्वारे ग्रामीण भागातील 8 वर्षावरील खेळाडून आपला व्हिडीओ किंवा बायोडाटा अपलोड करणे शक्य होणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंनाही योग्य प्रशिक्षण मिळणार आहे. गावपातळीवर फुटबॉल क्लब बनविले जाणार आहेत असेही गोयल यांनी सांगितले.