अग्निशमन कर्मचाऱ्यांना शहिदांचा दर्जा देणारे देशातील पहिले महामंडळ
नवी मुंबई, 15 मे 2017/AV News Bureau:
सिडको महामंडळातर्फे सिडको अग्निशमन दलातील सैनिकांसाठी 20 लाख रुपयांचा अपघात विमा काढण्यात येणार आहे. तसेच कर्तव्यपूर्ती करताना मृत पावलेल्या अग्निशमन दलांच्या कर्मचाऱ्यांना शहिदांचा दर्जा बहाल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडको प्रशानाने घेतला आहे. यासंबंधित प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या विमा संचालकांकडे पाठविण्यात आला आहे,
अग्निशमन कर्मचारी स्वत:च्या प्राणांची बाजी लावून आपत्कालिन परिस्थितीमध्ये लोकांच्या प्राणांचे व संपत्तीचे रक्षण करतात. महाराष्ट्र राज्य नगर विकास विभागाच्या दिनांक 22 -7-2016 रोजी मंजूर झालेल्या ठराव क्रमांक बीएमसी 2516/ डी.नं 248 नवी 21नुसार शहीदांचा दर्जा देण्याचा निर्णय सिडको महामंडळातर्फे घेण्यात आला आहे. या योजनेतंर्गत शहिद झालेल्या अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या उज्जवल भविष्यासाठी सोयी- सुविधा सिडकोमार्फत पुरविण्यात येतील. अग्निशमन दलातील वीरमरण प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांना शहिदांचा दर्जा देणारे सिडको महामंडळ हे देशातील पहिले महामंडळ आहे.
सिडको महामंडळातंर्गत द्रोणागिरी, खारघर, नवीन पनवेल आणि कळंबोली हे चार अग्निशमन केंद्रे व उलवे येथील नव्याने स्थापित करण्यात आलेल्या केंद्राचा समावेश आहे.