मुंबई, 14 मे 2017/AV News Bureau:
लोकलमधील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मोबाइल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना रेल्वे पोलिसांनी शनिवारी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अटक केली आहे. या चोरट्यांकडून महागडे मोबाइल फोन जप्त करण्यात आले असून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता रेल्वे पोलिसांनी वर्तविली आहे.
आरोपी अन्वर मोहम्मद अब्दुल रहमान शेख (38) याने गोवंडी रेल्वे स्थानकात एका प्रवाशाकडील अॅपल कंपनीचा मोबाइल फोन चोरून पळा काढला. इतर प्रवाशांच्या आरडाओरड्याने तेथे गस्तीवर असलेल्या राकेश मिश्रा आणि पबन सिंग या पोलीस कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून शेख याला पकडले. तर दुसऱ्या घटनेत कुर्ला रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक वर आरोपी शत्रुधन प्रवेश यादव (18) याने एका प्रवाशाचा मोबाइल फोन चोरून धावत्या गाडीत चढला. त्यावेळी गस्तीवर असणाऱ्या दिनेश पाटील, डी.बी. शिंदे आणि अखिलेश कुमार या पोलीस कर्मचारीही धावत्या गाडीत चढले आणि त्यांनी आरोपीला पकडले. त्याच्याकडून चोरीला गेलेला मोबाइल फोन जप्त केला. या दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई उपनगरीय लोकलमधी गर्दीचा फायदा घेत अनेक चोरटे प्रवाशांचे किमती सामान चोरतात. पाकीट मारणे, घड्याळ चोरणे, गळ्यातील सोनसाखळ्या चोरणे, मोबाइल चोरणे अशा घटना वारंवार उघडकीस येत आहे. शनिवारी पकडण्यात आलेल्या या चोरट्यांकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.