भाजप प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब पाटील दानवे
मुंबई, 11 मे 2017/AV News Bureau:
मी स्वतः शेतक-याच्या पोटी जन्म घेतला आहे. शेतक-यांचे दु:ख मला माहीत असून गेली ३५ वर्ष मी राजकारणात आहे. त्यामुळे मी शेतक-यांबद्दल अपशब्द वापरू शकत नाही. माझ्या आणि कार्यकर्त्यांच्या संवादाला शेतक-यांशी जोडू नये. मात्र तरीही शेतक-यांची मने दुखावली गेली असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.
१० मे २०१७ रोजी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिका-यांची बैठक जालना भाजपा कार्यालयात बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये ग्रामीण भागात जाऊन शेतक-यांशी संवाद साधणे व तो शेतात जाऊन साधणे, अशा प्रकारची चर्चा झाली. यासाठी बैठकीमध्ये तीन वर्षांची केंद्र सरकारची कामगिरी व अडीच वर्षाची राज्य सरकारची कामगिरी हेच विषय बैठकीत करावे अशा सूचना दिल्या होत्या. परंतु एका कार्यकर्त्याकडून तुरीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर तुरीच्या संदर्भात सरकारची भूमिका मी त्यांना समजावून सांगितली आणि पुन्हा केंद्र शासनाने एक लाख टन तुर खरेदीसाठी मान्यता दिल्याचे कार्यकर्त्याना समजावून सांगितले. हा माझा आणि कार्यकर्त्यांमधील संवाद होता. त्यामध्ये शेतक-यांना उद्देशून मी कोणताही अपशब्द वापरला नाही,असेही दानवे यांनी स्पष्ट केले.