संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानी पंतप्रधानांना पत्र धाडले
नवी दिल्ली, 10 मे 2017:
हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानने अटक केलेल्या आणि लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेल्या भारतीय नागरीक कुलभूषण सुधीर जाधव यांच्या शिक्षेला नेदरलॅंड येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगितीचा आदेश दिला आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे कुलभूषण यांच्या सुटकेसाठी भारतातर्फे सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठे बळ मिळाले आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला मोठी चपराक बसली आहे.
भारतीय नौदलाचे माजी अधिकारी असणाऱ्या कुलभूषण जाधव यांना हेरगिरी आणि विघातक कृत्ये केल्याच्या आरोपाखाली बलुचिस्तानमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराने 10 एप्रिल रोजी फाशीची शिक्षा ठोठावली. पाकिस्तानचे आरोप फेटाळत भारताने कुलभूषण यांना तातडीने सोडावे,असे पाकिस्तानला सुनावले तसेच आंतरराष्ट्रीय न्यायालयातही कुलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेचे प्रकरण लावून धरले. भारताच्या या मुत्सद्दीगिरीचा परिणाम झाला असून इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तसेच याप्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पत्रही पाठविले आहे. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचा भंग केला आहे.त्यामुळे कुलभूषण यांची फाशी रद्द करून त्यांना सोडून द्यावे, अशी मागणी भारताने केली होती.