डोक्यात सत्तेची नशा गेल्याने बेताल वक्तव्ये

खा. अशोक चव्हाण यांची दानवेंवर टीका

मुंबई,10 मे 2017/AV News Bureau:

एक लाख टन तूर खरेदीला परवानगी दिली तरी शेतकरी रडतात” असे वक्तव्य करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. सत्तेची नशा दानवेंच्या डोक्यात गेल्याने ते बेताल वक्तव्ये करीत आहेत. राज्यातले शेतकरी सत्तेची नशा उतरवल्याशिवाय राहणार नाहीत, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

जालना येथे बोलताना शेतक-यांबाबत दानवे यांनी केलेल्या वक्तव्यावर चव्हाण यांनी टीका केली.

राज्यातल्या शेतक-यांची सगळी तूर खरेदी होईपर्यंत तूर खरेदी केंद्र सुरु राहतील अशी घोषणा सरकारने केली होती. पण त्यानंतर सरकारने तूर खेरदी केंद्र बंद करून राज्यातील शेतक-यांचा विश्वासघात केला. काँग्रेस पक्षाने याविरोधात आवाज उठवल्यानंतर तूर खरेदी सुरु करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. पण अद्यापही अनेक ठिकाणी तूर खरेदी केंद्र सुरु झाली नाहीत. दरम्यानच्या काळात अवकाळी पावसाने तूर खरेदी केंद्राबाहेर रांगेत उभ्या असलेल्या अनेक शेतक-यांची तूर भिजल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.त्या शेतक-यांना नुकसान भरपाई देऊन त्यांची संपूर्ण तूर खरेदी करणे हे सरकारचे कर्तव्य असताना सत्ताधारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळणारी वक्तव्ये करित आहेत. यावरून या सरकारला शेतक-यांसंबंधी संवेदना नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याचे चव्हाण म्हणाले.