कोकण महसूल उपायुक्तांचे निर्देश
नवी मुंबई, 9 मे 2017/AV News Bureau:
कोकणात पावसाळ्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत असते. पावसाळ्यातील आपत्ती टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे. जिल्हानिहाय आढावा बैठक घेऊन आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी आराखडा तयार करावा. असे निर्देश कोकण महसूल उपायुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी आज दिले.
मान्सून पूर्व कोंकण विभागातील शासकीय यंत्रणेच्या तयारीची आढावा बौठक आज कोकण भवन येथे घेण्यात आली. त्यावेळी महसूल उपायुक्तांनी संबंधित यंत्रणांचा आढावा घेतला. कोंकण विभागातील सर्व नियंत्रण कक्ष 24 तास सुरु ठेवावेत असे आवाहन दांगडे यांनी केले आहे. सध्या अवेळी पावसाने वीजा पडण्याचे प्रमाण वाढले आहे वीज कोसळल्याने मनुष्यहानीसह वित्तहानीही मोठ्या प्रमाणात होत आहे. यादृष्टीने विभागात बसविण्यात आलेल्या वीजरोधक (लायटनिंग ऍरेस्टर) सुस्थितीत आहे किंवा नाही हे त्वरित पाहण्याचे निर्देश उपायुक्तांनी दिले.
या आढावा बैठकीला मुंबई शहराचे प्रभारी जिल्हाधिकारी बन्सी गवळी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, सिंधुदुर्ग जिल्हाचे निवासी उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग विजय जोशी, ठाणे जिल्हाचे निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी, नवी मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, मिरा -भाईदर महानगरपालिका उपायुक्त दिपक पुजारी, वसई – विरार महानगरपालिका उपायुक्त अजीज शेख, कल्याण –डोंबिवली महानगरपालिका उपायुक्त धनाजी तोरस्कर आदी उपस्थित होते.
कोकण विभागात बऱ्याच ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत असते. पूर रेषा निश्चित करणे, रस्त्यांची व पुलांची दुरुस्ती, औषध उपलब्धता, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, तात्पुरते निवारे, आरोग्य व स्वच्छता ठेवणे या अनुषंगाने केलेल्या कामाचा देखील बैठकीत आढावा घेण्यात आला.