रेशनवरील केरोसिन महागले

मुंबई, 6 मे 2017/AV News Bureau:

रेशनच्या दुकानावर मिळणाऱ्या केरोसिनच्या दरात वाढ करण्यात आली आहे. केरोसिनचा किरकोळ विक्री दर 19.29 रुपयांवरून 19.65 रुपये इतका करण्यात आला आहे.

मुंबई शहर व उपनगरासाठी रेशन दुकानातील केरोसिनच्या दरात 1 मे, 2017 पासून वाढ करण्यात आली आहे. केरोसिनचा सध्याचा एक्स डेपो दर 17 हजार 34 रुपये प्रति किलो लिटर वरून 17 हजार 284 रुपये प्रति किलो लिटर असा करण्यात आला आहे. केरोसीनच्या वाहतूकीसाठी येणाऱ्या डिझेल वरील खर्चात झालेली वाढच मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

केंद्र शासनाने दिनांक 31 मार्च,2017 रोजीच्या पत्रकानुसार 1 एप्रिल 2017 पासून ते 31 जुलै, 2017 पर्यंत प्रत्येक पंधरवाडयानंतर केरोसिनच्या सध्याच्या एक्स डेपो दरात प्रति लिटर 25 पैसे याप्रमाणे प्रति किलो लिटर 250 इतकी वाढ केली आहे. त्याआधारे अनुदानीत केरोसीनच्या किरकोळ विक्रीचा दर निश्चित करण्यात आला आल्याचे नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांनी कळविले आहे.