लखनऊ, 5 मे 2017:
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकार स्थापनेपासून नागरिकांच्या हितासाठी विविध योजना राबविण्याचा सपाटा लावला आहे. सर्वात आधी कृषीकर्जे माफ करून राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री योगी यांनी आता 5 रुपयांत पोटभर जेवण देण्याचा महत्वकांक्षी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लवकरच संपूर्ण राज्यात अन्नपुर्णा योजना सुरू करण्यात येणार आहे.
सर्वसामान्य गोरगरीब जनतेला दोन वेळचे अन्न अल्पदरात उपलब्ध व्हावे यासाठी तामिळनाडूत जयललिता यांनी अम्मा कॅन्टीन योजना सुरू केली होती. 1 ते 5 रुपयांत लोकांना नास्ता, जेवण देण्याच्या या योजनेचे देशभरात कौतूक केले गेले. यापार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 5 रुपयांमध्ये नागरिकांना जेवण उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून लवकरच त्याची अंमलबजावणी होणार असल्याचे त्यांनी ट्विटरवरून घोषणा केली आहे.
- नास्ता व जेवणातील पदार्थ
अन्नपुर्णा योजनेअंतर्गत सकाळचा नास्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण देण्यात येणार आहे.
3 रुपयांच्या नास्त्यामध्ये शिरा, इडली सांभार, भजी, चहा देण्यात येणार आहे तर 5 रुपयांच्या जेवणामध्ये डाळ, भात, चपाती, भाजी असे पदार्थ देण्यात येणार आहेत.
- सुरुवातील पाच शहरांत अन्नपुर्णा कॅन्टीन
प्रारंभी राज्यातील पाच शहरांमध्ये अन्नपुर्णा कॅन्टीन सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये कानपुर, लखनऊ, गोरखपुर, गाजियाबाद आणि वाराणसी या शहरांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ज्या भागात कष्टकरी आणि गरीबांचा अधिक राबता असतो, अशा ठिकाणी या कॅन्टीन सुरू करण्यात येणार आहेत.