पनवेल महापालिका निवडणुकीसाठी आघाडीचे जागावाटप
पनवेल, 2 मे 2017/AV News Bureau:
पनवेल महापालिका निवडणुकीत शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटला आहे. शेकाप 48 जागांवर निवडणूक लढणार असून उर्वरित जागा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे.
पनवेल महापालिका निवडणुकीसाठी शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी होवूनही जागा वाटपाबाबत एकवाक्यता होत नव्हती. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. कोणत्याही परिस्थितीत आघाडी करायची आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जागांबाबत अधिक ताठर भूमिका न घेण्याचे धोरण काँग्रेसने स्वीकारले होते. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा अधिक चिघळणार नव्हता हे आधीच स्पष्ट झाले होते. त्यानुसार आज झालेल्या बैठकीत 78 जागांपैकी शेकापला 48 जागा, काँग्रेसला 18 तर 12 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याबाबत एकवाक्यता झाल्याची माहिती शेकापचे नेते विवेक पाटील यांनी सांगितले.
पनवेल महापालिकेत विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार आहोत. त्यासाठी समविचारी पक्षांनीही आघाडीसोबत येण्याचे मान्य केले आहे. रिपब्लिकन सेना आघाडीसोबत राहणार असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितल्याची माहिती विवेक पाटील यांनी दिली.
आघाडीच्या जागा वाटपाबाबत तिन्हा पक्षांमध्ये एकवाक्यता आहे. काँग्रेसचे नेते भाई जगताप उद्या पनवेलमध्ये येण्याची शक्यता असून जागा वाटपाबाबतची घोषणा होईल, असे काँग्रेसचे नेते महेंद्र घरत यांनी दिली.
दरम्यान, शिवसेना-भाजपची युती होण्याची शक्यता आता धुसर आहे तर दुसरीकडे शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली आहे. अशा परिस्थितीत भाजप कशाप्रकारे आणि कोणत्या डावपेचाच्या सहाय्याने निवडणुकीला सामोरे जाणार हे याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.