पनवेल, 27 एप्रिल 2017 /AV News Bureau:
पहिल्यांदाच होणाऱ्या पनवेल महापालिका निवडणुकीसाठी शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करीत एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. जागा वाटपावर उद्या शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता असून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनेही जागा वाटपप्रकरणी अधिक ताठर भूमिका न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पनवेल महापालिकेच्या ७८ जागांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रचारात भाजपने आघाडी घेतली असली तरी अद्याप शिवसेनेसोबतच्या युतीचा तिढा कायम आहे. मात्र शिवसेना-भाजप युती होईल, असा विश्वास भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. तर शिवसेना स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. दुसरीकडे भाजपला रोखण्यासाठी शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने महाआघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. काँग्रेसने 30 च्या आसपास जागा मिळाव्यात अशी मागणी केली होती. मात्र आता आघाडी होणार असल्यामुळे 30 वरच अडून बसणार नसल्याचे काँग्रेसचे नेते महेंद्र घरत यांनी सांगितले.
दरम्यान, आघाडी करण्याबाबत शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकवाक्यता आहे. जागा वाटपाबाबतचा तिढाही लवकरच सुटणार असून उद्या, शुक्रवारी अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता आहे, असे शेकापचे नेते आ. विवेक पाटील यांनी सांगितले.