कोल्हापूर, 25 एप्रिल 2017/AV News Bureau:
शेतकरी कर्जमाफीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांनी आपले आंदोलन अधिक तीव्र केला असून कोल्हापूर येथून संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आज सुरूवात केली.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. या पत्रकार परिषदेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, काँग्रेस नेते रोहिदास पाटील, संघर्ष यात्रेचे समन्वयक आ. सुनिल केदार यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित होते.
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत या नादान सरकारच्या विरोधात लढण्याचे व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे सामर्थ्य आम्हाला दे, असे साकडे आज आई अंबाबाईला घातल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
राज्यभरात तूर खरेदीबाबत सुरू असलेल्या अनागोंदी कारभारावर आसूड ओढताना विखे पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांकडील शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी करण्याचा शब्द सरकारने दिला होता. परंतु, शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल तूर पडून असताना खरेदी बंद करणे, हा शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे. तूर खरेदी बंद करणे म्हणजे व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांच्या लुटीसाठी खुला परवाना देण्यासारखेच असल्याची तोफ विरोधी पक्षनेत्यांनी डागली.
- कर्जमाफीसाठी ग्रामसभेचे ठराव करा
शेतकऱ्यांची व्यथा मांडण्याचा आणखी एक सनदशीर प्रयत्न म्हणून, येत्या महाराष्ट्र दिनी, 1 मे रोजी महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींनी शेतकरी कर्जमाफी व हमीभावाच्या मागणीसाठी ग्रामसभेत ठराव करून ते सरकारकडे पाठवावेत, असे आवाहन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केले. संघर्ष यात्रेमुळे सरकारवर प्रचंड दबाव निर्माण झालेला आहे. या परिस्थितीत राज्यभरात ग्रामसभेचे ठराव झाले तर सरकारवर अधिक दडपण येईल,असेही ते म्हणाले.