नवी मुंबई,25 एप्रिल 2017 / AV News Bureau:
शहरातील फेरीवाल्यांचे महिन्याभरात आधारकार्ड नोंदणी करून फेरीवाला प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देण्यात येणार असल्याचे आश्वासन परवानाविभागाच्या उपायुक्त तृप्ति सांडभोर यांनी फेरीवाल्यांच्या शिष्टमंडळाला दिले.यामुळे फेरीवाल्यांनी आपले उपोषण मागे घेतल्याची माहिती फेरीवाल्यांच्या शिष्टमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
महापालिकेकडून फेरीवाल्यांवर सुरू असलेली कारवाई थांबवावी आणि फेरीवाल्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी नवी मुंबई फेरीवाला संघटना कृती समितीच्या नेतृत्वाखाली शहरातील फेरीवाल्यांच्या दहा संघटनांनी आज महापालिका मुख्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. यामध्ये शेकडो फेरीवाले सहभागी झाले होते.
फेरीवाल्यांच्या मागण्या
- प्रभाग फेरीवाला समिती तयार करण्यात यावी.
- शहर फेरीवाला समितीचा अहवाल प्रत्येक बैठकीनंतर सादर करण्यात यावा .
- पालिकेने शहरातील फेरीवाल्यांसाठी विमा पॉलिसी राबविण्यात यावी.
- फेरीवाल्यांसाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात यावेत .
- जप्त केलेल्या मालाची नासधूस न करता फेरीवाल्यांकडून दंडाची रक्कम आकारून त्यांना परत करण्यात यावा .
- तुर्भे स्टोअर्स ,कोपरी गाव ,वाशी सेक्टर 14 येथील सर्व्हे झालेल्या फेरीवाल्यांना फेरीचा व्यवसाय करण्यासाठी त्यांना गाळे वाटप करण्यात यावेत.अशा विविध मागण्या फेरीवाला कृती समिती कडून प्रशासनाकडे करण्यात आल्या.
मागण्यांचे निवेदन पालिकेच्या प्रशासन अधिका-यांकडे देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर, विनिता बाळकुंद्रे, बाळकृष्ण खोपडे ,मोहम्मद शेख आदी उपस्थित होते.
- फेरीवाल्यांना महिन्याभरात फेरीवाला प्रमाणपत्र देणार
शहरातील फेरीवाल्यांचे महिन्याभरात आधारकार्ड नोंदणी करून फेरीवाला प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देण्यात येणार असल्याचे आश्वासन परवानाविभागाच्या उपायुक्त तृप्ति सांडभोर यांनी फेरीवाल्यांच्या शिष्टमंडळाला दिले. 2014 पूर्वींच्या फेरीवाल्यांवर कारवाई करू नये, असे निर्देशही त्यांनी सर्व विभाग अधिकाऱ्यांना दिले. 15 दिवसांत शहर फेरीवाला समिती स्थापन करण्यात येणार असल्याचेही सांडभोर यांनी सांगितल्याची माहिती शिष्टमंडळाच्या सदस्यांनी दिली. फेरीवाल्यांच्या मागण्या मान्य झाल्यामुळे उपोषण मागे घेतल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.