बेस्टच्या बसमध्ये मोबाइल चार्ज करण्याची सोय

75 नव्या बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल

मुंबई, 25 एप्रिल 2017/AV News Bureau:

कामकाजानिमित्त सतत धावपळ करणाऱ्या मुंबईकरांचे अर्ध्याहून अधिक काम मोबाइलवरूनच होत असते. सतत फोनवर बोलल्यामुळे मोबाइलची बॅटरी कधी संपून जाते हे कळतच नाही. मात्र आता मोबाइल चार्जिंगची अधिक काळजी करण्याचे कारण नाही. कारण बेस्टने आपल्या ताफ्यात आलेल्या नव्या 303 कोऱ्या बसगाड्यांमध्ये मोबाइल चार्ज करण्याची नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पहिल्या टप्प्यातील 75 गाड्या आज मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या असून उर्वरित बसेस जूनपर्यंत रस्त्यावर धावू लागणार आहेत. प्रत्येक गाडीत आसनांच्या बाजूला 8 मोबाइल चार्जर्स असणार आहेत.

नव्या बसची वैशिष्ट्ये

  • टाटा मोटर्सने तयार केलेल्या या बसेसमध्ये आधुनिक युरो-4 इंजिन आणि ऑटोमेटिक ट्रान्समिशन बसविण्यात आले आहे. त्यामुळे बसचालकाला क्लचचा वापर करण्याची गरज पडणार नाही.
  • बसच्या पुढील आणि मागील दरवाजाच्या पहिली पायरी कमी उंचीची ठेवण्यात आली आहे. तसेच दरवाजाची रुंदी अधिक ठेवल्यामुळे बसमधून चढणे-उतरणे सोयीचे जाणार आहे.
  • बसमधील हवा खेळती राहण्यासाठी छताला मोठ्या क्षमतेची ब्लोअर सिस्टिम बसविण्यात आली आहे.
  • आरामदायी प्रवासासाठी बसच्या पाठीमागे एअर सस्पेंशन बसविण्यात आले आहे.
  • अधिक प्रकाशासाठी एलईडी ट्युबलाइट्स बसविण्यात आल्या आहेत.
  • गाडीची लांबी नेहमीपेक्षा अधिक आणि छताला आतील भागाला प्री कोटेड अल्युनिमिअम पत्रे.

शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांच्याहस्ते या बसचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महापौर विश्वनाथ महादेश्वर, उपमहापौर हेमांगी वरलीकर, राहुल शेवाळे, सदा सरवनकर, श्रद्धा जाधव आदी मान्यवर  उपस्थित होते.