खा. अशोक चव्हाण यांचा इशारा
मुंबई, 24 एप्रिल 2017/AV News Bureau:
सरकारने नाफेडमार्फत सुरु असलेली तूर खरेदी केंद्र अचानक बंद करून राज्यातील शेतक-यांचा विश्वासघात केला असून तूर खरेदी केंद्र तात्काळ सुरु केली नाहीत तर काँग्रेस पक्ष राज्यभरात तीव्र आंदोलन करेल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिला आहे.
टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी तूर खरेदी केंद्र बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयावर टीका केली.
गेल्या एक महिन्यापासून बारादानांअभावी शेतकऱ्यांची तूर खरेदीअभावी पडून आहे. तूरीचे भाव पडल्याचे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. राज्यात कोणत्याही शेतीमालाला हमीभाव मिळाला नाही. या सरकारच्या हमीलाही किंमत राहिली नसून सरकारचा शेतक-यांबाबत दुजाभाव कायम आहे. त्यातच सरकारने अचानक तूर खरेदी केंद्र बंद केली आहेत. सरकारच्या या तुघलकी निर्णयामुळे या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? असे विचारण्याची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी तूर खरेदी केंद्राबाहेर पाच-पाच किलोमीटर रांगा आहेत. व्यापा-यांनी भाव पाडले आहेत. शेतकरी हैराण आहे. पण सरकारला याचे काही देणे घेणे नाही अशी टीका चव्हाण यांनी केली.
गेल्यावर्षी तूर डाळीचे भाव कडाडल्यामुळे तूर उत्पादनासाठी शेतक-यांना प्रोत्साहन देईल असे सरकारने जाहीर केले होते. त्यावर विश्वास ठेवून शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड केली. यंदा पाऊस चांगला झाल्याने उत्पादनही भरपूर झाले. सरकारने तुरीला हमीभाव जाहीर करून खरेदीही सुरु केली मात्र बारदाना आणि गोडाऊन उपलब्ध नाही असे कारण देऊन बहुतांशी शेतक-यांची तूर खरेदी केली नाही. ही राज्यातील शेतक-यांची फसवणूक आहे,असेही चव्हाण म्हणाले.