कामोठे येथील इंद्रविहार सोसायटीमधील घटना
नवी मुंबई, 23 एप्रिल 2017/AV News Bureau:
एकाच कुटुंबातील तिघांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी कामोठे येथे उघडकीस आली आहे. नैराश्यातून ही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कामोठे, सेक्टर 36 मधील इंद्रविहार सोसायटीत सुनील उर्फ इंद्रजित दत्ता (50) हे डॉ. जस्मीन पटेल (45) आणि मुलगी ओसियन(16) यांच्यासोबत राहत होते. घरी काम करणारी महिला नेहमीप्रमाणे आज सकाळी दत्त यांच्या घरी गेली. मात्र बेल वाजवूनही दरवाजा उघडला नाही. त्यामुळे घरकाम महिलेने तिच्याकडे असलेल्या चावीने दरवाजा उघडला असता हा प्रकार उघडकीस आला. तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. याप्रकरणी घरकाम करणाऱ्या महिलेने शेजाऱ्यांना हा प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. याप्रकरणी कामोठे पोलिसांनी घटनास्थळा जावून तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पनवेल येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंद्रजित दत्ता आणि जस्मीन पटेल हे लीव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते असे कळते. जस्मीन यांची तब्बेत ठीक नव्हती. त्याची मुलगी गतीमंद होती. त्यामुळे आपले काही बरेवाईट झाले तर मुलीचा सांभाळ कोण करणार याची त्यांना चिंता सतावत होती. यातून आलेल्या नैराश्यातूनच दोघींनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी जस्मीन पटेल यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती.
दरम्यान, जस्मीन आणि त्यांच्या मुलीने आत्महत्या केल्यानंतर निराश झालेल्या इंद्रजित पटेल यांनीही चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याचे पोलिसांना आढळून आले. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.