मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी
नवी दिल्ली, 23एप्रिल 2017/AV News Bureau:
शेतकरी आत्महत्याग्रस्त विदर्भ व मराठवाडयातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांसाठी केंद्र शासनाने मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नीति आयोगाच्या कार्यकारी परिषदेच्या तिसऱ्या बैठकीत केली.
राष्ट्रपती भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीति आयोगाच्या कार्यकारी परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीस केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह, रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, कृषी मंत्री राधामोहन सिंह, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, नीति आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. अरविंद पनगारिया आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून सिंचन सुरक्षितता देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. विविध उपाययोजनांमुळे कृषी क्षेत्रात 12.5 टक्के इतका घसघशीत विकासदर गाठण्यात राज्याला यश आले आहे. नाबार्डकडून राबविण्यात येत असलेल्या दीर्घकालीन ग्रामीण पत निधीच्या (लाँग टर्म रूरल क्रेडिट फंड) धर्तीवर सुक्ष्म सिंचनासाठी केंद्राने निधी उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त विदर्भ व मराठवाडयातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांसाठी केंद्र शासनाने मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
डाळींचे उत्पादन वाढविण्यासाठी सुरक्षित साठा (बफर स्टॉक) निर्माण करण्यासह अतिरिक्त साठा क्षमताही निर्माण करणे आणि त्यासोबतच आयात धोरण निश्चित करणे आदी दीर्घकालिन योजना आखाव्यात, अशी मागणीही फडणवीस यांनी यावेळी केली.
राज्यातील सर्व ग्रामपंचायती जोडण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून महानेटच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नांना केंद्र शासनाने मदत करावी, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली.