कार शोरुमच्या आगीत दोघांचा जळून मृत्यू

नवी मुंबई,23 एप्रिल 2017/AV News Bureau:

खारघर येथील मारूती सुझुकीच्या शोरूमला लागलेल्या आगीत दोन सुरक्षा रक्षकांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे  घडली. या आगीत जवळपास दहा ते बारा गाड्याही जळून खाक झाल्या. शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायन- पनवेल महामार्गाजवळ खारघर सेक्टर 10 मधील आदित्य प्लॅनेट या इमारतीच्या तळमजल्यावर मारुती सुझुकी गाड्यांचा शोरुम आहे. सकाळी पाचच्या सुमारास अचानक धूर येत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. तोपर्यंत आग वाढून शोरूमच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले दोन कर्मचारी कृष्ण कुमार आणि जितेंद्र कुमार यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. सकाळी सव्वा दहापर्यंत आग आटोक्यात आणल्याची माहिती खारघर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.