रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले
पुणे, 21 एप्रिल 2017 /AV News Bureau:
दलितांवरिल अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी दलित पँथर झंझावाताप्रमाणे देशभर वाढली. दलित पँथरच्या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या त्यागातून आपले नेतृत्व उभे राहिले आणि केंद्रीयमंत्रीपदापर्यंत मजल मारता आली, असे उद्गार रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काढले.
पुणे येथील नेहरू मेमोरियल हॉल येथे पँथरच्या चळवळीत काम केलेल्या कार्यकार्त्यांचा आठवले यांच्याहस्ते पँथर गौरव पुरस्कार देवून गौरव करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले सामाजिक आर्थिक समतेचा विचार सामाजिक ऐक्याचा नारा देत दलित पँथर देशभर पोहोचली. अनेक राज्यात पँथरच्या शाखा स्थापन झाल्या. खांद्याला खांदा लावून पँथर सामाजिक क्रांतिसाठी लढत राहिले. कुटुंबाकडे दुर्लक्ष करून अनेक आंदोलने पँथरने जिंकली. जातिवाद्यांवर आपल्या आक्रमकतेची दहशत बसविली. पँथरच्या चळवळीमुळेच माझे नेतृत्व मोठे झाले असे, आठवले यांनी सांगितले.