नवी दिल्ली, 21 एप्रिल 2017:
भारतीय नौदलाने आज जहाजावरुन जमिनीवर मारा करु शकणाऱ्या ब्राह्मोस लँड ॲटक सुपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. भारतीय नौदलाच्या “तेग” या युद्ध नौकेवरुन डागण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राने जमिनीवरील लक्ष्याचा अचूक वेध घेतला. या क्षेपणास्त्र चाचणीमुळे भारताच्या संरक्षण क्षमतेत मोठी वाढ झाली आहे.
ब्राह्मोस क्षेपणास्त्र भारत आणि रशिया यांनी संयुक्तरित्या विकसित केले आहे. या क्षेपणास्त्राची जहाज भेदी आवृत्ती याआधीच भारतीय नौदलात दाखल करण्यात आली आहे. भारतीय नौदलातील कोलकाता, रणवीर आणि तेग प्रकारातील नौकांमध्ये हे क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या जहाजावरुन जमिनीवर मारा करण्याच्या आवृत्तीमुळे खोल समुद्रात उभ्या असणाऱ्या जहाजावरुन जमिनीवरील लांब अंतरावर असलेली लक्ष्य उध्वस्त करण्याचे सामर्थ्य भारतीय नौदलाला प्राप्त झाले आहे.
ब्राह्मोसच्या या यशस्वी चाचणीमुळे भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात भर पडली असून असे सामर्थ्य असणाऱ्या निवडक देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे.