नवी मुंबई, 20 एप्रिल 2017/AV News Bureau:
हिंदी पत्रकारितेतील पितामह म्हणून ओळखले जाणारे बाबुराव पराडकर यांचे पत्रकारितेमधील योगदान नव्या पिढीसमोर मांडणाऱ्या “क्रांतिकारी पत्रकार बाबुराव विष्णू पराडकर” या पुस्तकाचे प्रकाशन आज झाले. कोकण विभागीय महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले असून कोकण विभाग उपसंचालक (माहिती) डॉ. गणेश व. मुळे हे या पुस्तकाचे लेखक आहेत.
देशमुख यांनी डॉ. मुळे यांच्या पुस्तकाचे कौतूक केले. मूळचे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असणारे बाबुराव पराडकर हिंदी पत्रकारितेत पितामह आहेत. मराठी भाषेतील हे पहिलेच पुस्तक आहे. कोकणातील अनेक मान्यवरांत त्यांची देश पातळीवर गणना होते. हे पुस्तक पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे ते म्हणाले.
पत्रकारितेचा अभ्यास करताना बाबुराव पराडकर यांच्या पत्रकारितेचा अभ्यास केला. पराडकर यांनी अनेक शब्द हिंदीत रुढ केले आहेत. मराठी माणसाचे हिंदी पत्रकारितेचे योगदान नव्या पिढीसमोर आणण्यासाठी हे पुस्तक लिहिण्याची कल्पना मनात आली असे डॉ. मुळे यांनी सांगितले.
बाबुराव पराडकर हे मराठी भाषिक असून हिंदी पत्रकारिता कशी समृध्द केली आहे. हे या पुस्तकात मांडण्यात आले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ प्रा.गजानन शेफाळ यांचे आहे. डॉ. गणेश मुळे यांचे या आधी आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
यावेळी रायगडचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, रायगडचे अप्पर जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर उपस्थित होते.