मुंबई, 18 एप्रिल2017/AV News Bureau:
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील तंत्रनिकेतन महाविदयालयांसाठी राबवल्या जाणाऱ्या दोन शिष्यवृत्ती योजनांच्या लाभांची रक्कम आता थेट विदयार्थ्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज राज्य शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना शासन अनुदानित आणि खाजगी विनाअनुदानित महाविदयालय/तंत्रनिकेतनमध्ये राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विदयार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्काच्या 50 टक्के मर्यादेपर्यंतच्या शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती देण्यात येते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विदयार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्काच्या 50 टक्के मर्यादेपर्यंतच्या शिक्षण शुल्काची प्रतिपूर्तीची रक्कम आता थेट बँक खात्यात जमा होणार आहे. या योजनेनुसार उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैदयकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास, तसेच मत्स्य विभागातील विशिष्ट व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिक्षण शुल्काची 50 टक्के रक्कम राज्य शासन देते. आता या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे 2017-18 पासून ही रक्कम संबंधित शैक्षणिक संस्थांऐवजी शिष्यवृत्ती स्वरुपात विदयार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांना शासकीय, शासन अनुदानित व विनाअनुदानित आभियांत्रिेकी महाविदयालये/ तंत्रनिकेतन मध्ये प्रवेश घेणाऱ्या विदयार्थ्यांपैकी ज्या विदयार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी आहेत किंवा ज्यांचे पालक नोंदणीकृत मजूर आहेत अशा विदयार्थ्यांकरिता डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. अनुदानित अभियांत्रिेकी महाविदयालये आणि तंत्रनिकेतनमध्ये प्रेवश घेणाऱ्या विदयार्थ्यांपैकी ज्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी आहेत, अशा विदयार्थ्यांनाही डॉ.पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजनेच्या लाभाची रक्कमही बँक खात्यात जमा होणार आहे.