भाजप नेते रामशेठ ठाकूर यांचा टोला
पनवेल, 18 एप्रिल 2017 /AV News Bureau:
पनवेल महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी सकारात्मक चर्चा झाल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत, असा टोला भाजपचे नेते रामशेठ ठाकूर यांनी मारला.
भाजप आणि शिवसेना यांची विचारसरणी एकच असल्याने एकत्र लढल्यास दोघांनाही फायदा होवू शकतो त्यामुळे शिवसेना नेते खा. अनंत गीते, आ. मनोहर भोईर आणि बबनदादा पाटील यांच्याशी मुंबई येथे सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपली भूमिका जाहीर करतील अशी माहिती लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी सांगितले. युती होणार हे निश्चित झाल्यानेच विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे तिकीटवाटपावरून नाराज होत कोण भाजपमधून बाहेर पडतेय याकडे विरोधकांचे लक्ष लागले आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सर्वात जास्त इच्छुक उमेदवार भाजपकडे असल्याने कोण जिंकणार याचा अंदाज येईल. शिवाय भाजपचे कार्यकर्ते नाराज होतील पण पक्ष सोडणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
- निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यावर उमेदवारांची नावे घोषित करणार
भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या ५ महिला महापौर पदाच्या दावेदार आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर भाजपतर्फे सर्व उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.