समृध्दी महामार्ग शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची टीका

संघर्षयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा शहापुरात समारोप

शहापूर, 18 एप्रिल 2017 /AV News Bureau:

सरकारने घाट घातलेला समृध्दी महामार्ग हा विकासाचा नव्हे तर या भागातील हजारो शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा मार्ग असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संघर्षयात्रेदरम्यान शहापुर-चेरपुली येथील जाहीर सभेत केली.

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, पिपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे), समाजवादी पार्टी आदी विरोधी पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा आज शहापुर तालुक्यातील चेरपुली या गावी समारोप करण्यात आला.

मुंबई- नागपूर या दोन्ही शहरांदरम्यान प्रस्तावित असणाऱ्या  सातशे किलोमीटरच्या समृध्दी महामार्गासाठी शेतकऱ्यांची ५६ हजार एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे. या महामार्गामुळे शहापुर, इगतपुरी, सिन्नर, कोपरगाव या भागातील सुपीक व बागायती जमीन येथील शेतकऱ्यांना गमावाव्या लागणार आहेत. मुंबई  ते नागपूर प्रवासासाठी जलद विमानसेवा, रेल्वे सेवा उपलब्ध असताना तसेच वाहतुकीसाठी सध्याचा मार्ग ज्याचे विस्तारीकरण करुन वाहतुकीसाठी उपलब्ध करता येत असताना नव्या महामार्गाचा घाट नेमका कोणाची समृध्दी करण्यासाठी आहे ? असा सवाल यावेळी अजित पवार यांनी सरकारला केला.

 एकीकडे सरकार तिजोरीत पैसा नसल्याचे कारण सांगते त्याच वेळी समृध्दी महामार्गासाठी ४६ हजार कोटी रुपये, मुंबई- अहमदाबाद या शहरांना जोडणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी १ लाख कोटी, बड्या उद्योगपतीचे कर्ज माफ करण्यासाठी केंद्र सरकार २ लाख ८० हजार कोटींवर पाणी सोडते. त्याच वेळी कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्या करीत असलेल्या व अडचणीत सापडलेल्या आमच्या शेतकऱ्यांचे ३० हजार कोटी रुपये कर्ज माफ करण्यासाठी  पैसे नसल्याचे कारण सरकार सांगत आहे ही बाब दुर्दैवी आहे,असेही पवार म्हणाले.

  • लवकरच संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा

शेतकऱ्यांसाठी चांदा ते बांदा सुरु केलेला हा संघर्ष इथेच थांबणार नसून संघर्ष यात्रेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यानंतर आता रायगड ते सातारा असा तिसरा टप्पाही लवकरच सुरु करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावरील समाधीला अभिवादन करुन तिसऱ्या टप्प्यातील संघर्षयात्रेची सुरुवात करण्यात येणार आहे. रायगड- रत्नागिरी- सिंधुदुर्ग-कोल्हापूर-सांगली- सातारा असा या संघर्षयात्रेचा मार्ग असणार असल्याचे पवार यांनी सांगितले.