विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे आवाहन
शिरपूर, 17 एप्रिल 2017/AV News Bureau:
युपी मॉडेलचा अभ्यास करण्यात वेळ घालविण्यापेक्षा तातडीने कर्जमाफीचा निर्णय घ्या अन्यथा हा संघर्ष अधिक तीव्र करावा लागेल, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
शिरपूर येथे रविवारी संघर्ष यात्रेच्या निमित्ताने विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली. गेल्या दोन वर्षांपासून कर्जमाफीची आम्ही मागणी करीत आहोत. सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर कर्जमाफीच्या मागणीचा संघर्ष आम्ही सुरु केला,पण आमदारांना निलंबीत करुन आमच्या या आंदोलनाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सरकारने केला. पण आमच्या सर्वांचे निलंबन झाले तरी, आमचा हा संघर्ष आता थांबणार नाही. कारण कर्जमाफीबद्दल सरकारची उदासिनता स्पष्टपणे दिसून आली आहे. केवळ योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी देवू असे म्हणत हे सरकार शेतक-यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप पाटील यांनी केला. या प्रसंगी माजी उपमुख्यमंत्री आ.अजित पवार, राष्ट्रवादीचे गटनेते आ.जयंत पाटील, आ.जोगेंद्र कवाडे, आ.अबु आझमी यांसह कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.