पनवेल,17 एप्रिल 2017/AV News Bureau:
सफाई कामगारांच्या आंदोलनामुळे शहरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे भाजपने सिडकोसमोर कचरा फेको आंदोलनाचा इशारा दिला होता. यापार्श्वभूमीवर सिडको प्रशासनाने प्रत्येक नोडमध्ये २ जेसीबी आणि ४ डंपरने पोलीस संरक्षणासह कचरा उचलण्यास सुरवात केल्याची माहिती सिडको प्रशासनाने दिली आहे.
समान काम समान वेतन यासाठी सिडकोच्या कंत्राटी सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन सुरु ठेवले आहे. या आंदोलनामुळे शहरात कचऱ्याचा ढीग साचला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पनवेल भाजपतर्फे सिडको भवनावर कचरा फेको आंदोलन काढण्यात आले. सोमवारी सकाळी ११ वाजता भाजप कार्यकर्ते कचरा फेकण्यासाठी सिडको कार्यालयावर धडकले. कचऱ्याचा निकाल लावल्याशिवाय आपण येथून जायचे नाही असा निर्धार करीत कचऱ्याच्या डब्यांसह आंदोलनकर्त्यांनी सिडको कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यामुळे सिडकोने आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले. यावेळी प्रत्येक नोडमध्ये २ जेसीबी आणि ४ डंपरने पोलीस संरक्षणासह कचरा उचलण्यास सुरवात करण्यात येईल असे आश्वासन यावेळी सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांनी दिले.