मुंबईचे तापमानही अडीच डिग्रीने वाढलेय
मुंबई, 17 एप्रिल 2017/AVNews Bureau:
गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पारा चांगलाच वाढला असून उन्हाचे चटके अधिक जाणवू लागले आहेत. पुढील काही दिवसांत विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून तापमान 40 अंश सेल्सिअस इतके राहणार आहे. मुंबईचे तापमानही वाढत असून आज 35.3 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले आहे. राज्यात सर्वाधिक तापमान जळगाव, नांदेडमध्ये जवळपास 45 अंश सेल्सिअस इतके नोंदल्याची माहिती प्रादेशिक हवानमान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मे महिना अद्याप सुरू झालेला नाही. मात्र एप्रिलमध्येच तापमानाने उच्चांक गाठला आहे. दिवसाचा पारा 40 डिग्री पार करू लागला आहे. सातारा, सोलापूर, सांगली, लातूर, जळगाव, नांदेड आदी भागांमध्ये दिवसाचे तापमान सरारसरी 40 अंशं सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. पुढच्या 48 तासांमध्ये ही परिस्थिती कायम राहणार आहे. जळगावमध्ये आज तापमान 44.5 अंश सेल्सिअस तर नांदेडमध्ये 45.5 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
- मुंबईचे तापमान अडीच डिग्रीने वाढलेय
मुंबईतही उन्हाचे चटके बसू लागले आहेत. मुंबई शहराचे सरासरी तापमान 31 ते 32 च्या आसपास असते. मात्र आज कुलाबा येथे 34.2 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे 35. 3 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले आहे. मुंबईतील सरासरी तापमानाच्या तुलनेत अडीच डीग्रीने वाढ झाल्याची माहिती प्रादेशिक हवामान खात्याचे उपसंचालक के. होशाळकर यांनी दिली.