भारताची पाकिस्तानकडे मागणी
नवी दिल्ली, 15 एप्रिल 2017/AV News Bureau:
हेरगिरीच्या आरोपावरून फाशीची शिक्षा ठोठावलेल्या कुलभूषण जाधव यांच्यावरच्या आरोपपत्राची आणि शिक्षेची प्रमाणित प्रत द्या, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे. जाधव यांना सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे भारत सरकारने म्हटले आहे.
हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या न्यायालयाने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. पाकिस्तानच्या या निर्णयाचे तीव्र पडसाद भारतात उमटत आहेत. पाकिस्तानने तातडीने जाधव यांना सोडावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. भारत सरकारनेदेखील जाधव यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानशी चर्चा सुरू केली आहे. तत्पूर्वी कुलभूषण जाधव यांच्यावर ठेवलेल्या आरोपपत्राची आणि शिक्षेची प्रमाणित प्रत पाकिस्तानने तातडीने द्यावी तसेच भारतीय दुतावासाला जाधव यांच्याशी संपर्क करू द्यावा, अशी मागणीही भारताने केली आहे.
पाकिस्तानमधील भारताचे उच्चायुक्त गौतम बंबवाले यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांची भेट घेतली आणि जाधव यांच्या सुटकेबाबत सविस्तर चर्चा केली. जाधव यांच्याशी संपर्क करू देण्याची मागणी भारताने आतापर्यंत १३ वेळा केली होती.
दरम्यान, जाधव यांच्या शिक्षेविरोधात त्यांच्या कुटुंबियांकडून दाद मागण्याबरोबरच कायदेशी बाबींचाही अवलंब करण्याचा भारताचा विचार आहे.त्यांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचेही भारत सरकारने स्पष्ट केले.