सिंधुदुर्ग, 15 एप्रिल 2017/AV News Bureau:
मालवणच्या वायरी येथील समुद्र किनाऱ्यावर आठ जण बुडाल्याची खळबळजनक घटना आज सकाळी 11.30 च्या सुमारास घडली. बुडालेले सर्व विद्यार्थी बेळगाव येथील मराठा इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी आहे. मृतांमध्ये 3 विद्यार्थिनी, 4 विद्यार्थी आणि 1 प्राध्यापकाचा समावेश आहे.
मराठी इंजिनिअरिंग महाविद्यालयीचे 50 विद्यार्थी सिंधुदुर्ग, मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ येथील समुद्रावर सहलीसाठी आले होते. आज सकाळी 11 च्या सुमारास मुले, मुली समुद्राच्या पाण्यात उतरले होते. मात्र भरतीमुळे त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्यापैकी 11 जण पाण्यात बुडू लागले. स्थानिकांनी तातडीने धाव घेत मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तिघांना वाचविण्यात यश आले तर अन्य 8 जण बुडाले. या घटनेनंतर किनाऱ्यावर भितीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने अत्यवस्थ विद्यार्थी आणि शिक्षकांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल आल्याची माहिती मालवण पोलिसांनी दिली.