36 अतिरेकी मारले गेल्याचे वृत्त
वॉशिंग्टन, 14 एप्रिल 2017:
अफगाणिस्तानातील आयसिसचे जाळे उध्वस्त करण्यासाठी अमेरिकेने आपला सर्वाधिक शक्तीशाली ‘MOAB’ या बॉम्बने हल्ला केला. गुरुवारी सायंकाळी 7 च्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात सुमारे 36 अतिरेकी मारले गेल्याचे वृत्त आहे.
अमेरिकेच्या लष्कराने दहशतवाद्यांविरोधातील लढाई अधिक तीव्र केली आहे. याचाच एक भाग म्हणून अफगाणिस्तानमध्ये सक्रीय असलेल्या आयसिसचे तळ उध्वस्त करण्यासाठी बॉम्ब हल्ला करण्यात आला . GBU-43/B Massive Ordnance Air Blast Bomb (MOAB) असे या बॉम्बचे नाव असून तो अमेरिकेचा अण्वस्त्रविरहित सर्वाधिक शक्तीशाली बॉम्ब म्हणून ओळखला जातो. या बॉम्बला मदर ऑफ ऑल बॉम्ब असेही म्हटले जाते. तब्बल 21 हजार 600 पौंड (9797 किलो )वजनाचा हा बॉम्ब MC-130 या विमानातून अफगाणिस्तानातील अचिन जिल्ह्यातील नानगरहार प्रांतातील आयसिसचे तळ उध्वस्त करण्यात आल्याचे वृत्तात म्हटले आहे. अमेरिकेच्या या हल्ल्यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात 36 दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. मात्र बॉम्बची संहारक्षमात पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान व्हाइट हाउसचे प्रेस सेक्रेटरी सीन स्पायसर यांनी पत्रकार परिषदेत या हल्ल्याबातची माहिती दिली. अफगाणिस्तानातील गुहामधील आयसिसचे तळ नष्ट करण्यासाठी GBU-43 हा शक्तीशाली बॉम्ब टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.