बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत घडवायचा आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही

नागपुर, 14 एप्रिल 2017:

सामाजिक-आर्थिक विकास, पायाभूत सोयी-सुविधा विकास, उच्च शिक्षण, डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासह, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या स्वप्नातला सर्वसमावेशक भारत घडवायचा आहे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागपुर येथे दिली.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी, नागपूरमध्ये, दीक्षाभूमीला  भेट देऊन पुष्पांजली अर्पण केली. आंबेडकर जयंतीदिनी  नागपूरला भेट देऊन दीक्षा भूमीवर प्रार्थना करण्याची संधी मिळाल्याने  आपल्याला आनंद झाला. आयुष्यात अनेक संकटांना सामोरे जावूनही आंबेडकरांच्या मनात कटुता किंवा सूड भावना नव्हती. त्यामुळे त्यांना हवा असलेला सर्वसमावेशक भारत घडवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे पंतप्रधान म्हणाले.

नागपुर दौऱ्यात महाजेनकोच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्राची प्रत्येकी 660 मेगावॅट क्षमतेची तीन युनिट  पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण करण्यात आली. देशात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी नीती आयोगाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी भीम आधार पे ॲपचे उद्‌घाटन केले. भीम-आधार ॲप या भीम ॲपचा व्यापारी विभाग असून, यामुळे आधारचा वापर करुन डिजिटल पद्धतीने पैसे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भीमसाठी आज दोन नवीन प्रोत्साहनार्थ योजनांचा शुभारंभ केला. कॅशबॅक आणि रेफरल बोनस या दोन नवीन योजना 495 कोटी रुपयांच्या असून, कालावधी सहा महिने असेल. रेफरल बोनस योजनेअंतर्गत सध्याच्या भीम ॲपचा वापर करणारे आणि नवीन वापरकर्ते यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यात येणार आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते दोन विशेष टपाल तिकीटाचे प्रकाशनही करण्यात आले. दीक्षा भूमीचे दर्शन घडवणारे एक तिकिट, तर भगवान गौतम बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा दुसऱ्या तिकीटावर आहेत. आयआयएम नागपूर आणि एम्स्‌,  आयआयआयटी तसेच महाराष्ट्र राष्ट्रीय  विधी विद्यापीठाचे भूमीपूजनही  पंतप्रधानांनी केले.

यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल चे.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, हंसराज अहिर, रामदास आठवले आदी उपस्थित होते.