मुंबई, 13 एप्रिल 2017/AV News Bureau:
ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत बेस्टने मुंबईकरांसाठी तापदायक बातमी दिली आहे. बेस्टच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या सर्व वातानुकूलित (एसी) बसगाड्यांची सेवा सोमवारपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे आता बेस्टचा गारेगार प्रवास आता मुंबईकरांना मिळणार नाही. बेस्टच्या एसी बस तोट्यात चालत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
बेस्टच्या वातानुकूलित बसमधून प्रवास करण्यासाठी अनेकांनी पास काढले होते. मात्र वातानुकूलित बसच्या पासधारकांना साध्या तसेच मर्यादीत बसगाड्यांमधून प्रवास करण्याची मूभा असेल तसेच ज्या प्रवाशांना आपल्या बसपासाची उर्वरित रक्कम हवी असल्यास ती बेस्ट उपक्रम परत करणार असल्याचेही बेस्टने म्हटले आहे. वातानुकूलित बससेवा खंडीत झाल्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दलही बेस्ट प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.