ठाणे, 13 एप्रिल 2017/AV News Bureau:
विना हेल्मेट मोटारसायकल चालविणाऱ्या व्यक्तीकडून 200 रुपयांची लाच स्वीकारताना ठाणे येथील वाहतूक शाखेच्या पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सापळा रचून रंगेहाथ पकडले.
विना हेल्मेट मोटारसायकल चालविल्याप्रकरणी वागळे इस्टेट, ट्रॅफिक युनिटचे पोलीस हवालदार अनिल राजाराम शिंदे यांनी काल तक्रारदार यांचे लायसन्स जप्त केले होते. लायसन्स परत देण्यासाठी अनिल शिंदे यांनी पाचशे रुपये मागतिले होते. त्यामुळे ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केल्यानंतर सापळा रचून शिंदे यांना 200 रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याची माहिती एसीबीचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी दिली.
याप्रकरणी अनिल शिंदे यांच्याविरोधात भ्रष्टाचा प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अधिक तपास सुरू असल्याचे कुंभार यांनी सांगितले.