नवी मुंबई, 12 एप्रिल 2017/AV News Bureau:
नवी मुंबई महापालिका हद्दीत प्रशासनाची परवागनी न घेताच बांधकाम केल्याप्रकरणी ३४४ अनधिकृत बांधकाम धारकांवर एमआरटीपी कायद्याअंतर्गत नोटिसा बजावून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामुळे अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
उच्च न्यायालयात महाराष्ट्र शासनाव्दारे दाखल जनहित याचिका क्रमांक 138/2012 व 80 /2013 च्या सुनावणीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेची परवानगी न घेता उभारण्यात येत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर न्यायालयाने कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त यांचे निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण आणि अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त अमरीश पटनिगेरे यांच्या नियंत्रणाखाली, सर्व आठही विभाग कार्यालय क्षेत्रात एम.आर.टी.पी. कायदा 1966 च्या कलम 53 व 54 अंतर्गत अनधिकृत बांधकाम करणा-यांवर संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच या अनधिकृत बांधकामांवर थेट कारवाई सुध्दा करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
विभाग कार्यालयनिहाय गुन्हे दाखल
- बेलापूर विभाग कार्यालय क्षेत्रात – 36
- नेरूळ विभाग कार्यालय क्षेत्रात – 57
- वाशी विभाग कार्यालय क्षेत्रात – 104
- तुर्भे विभाग कार्यालय क्षेत्रात – 29
- कोपरखैरणे विभाग कार्यालय क्षेत्रात – 30
- घणसोली विभाग कार्यालय क्षेत्रात – 44
- ऐरोली विभाग कार्यालय क्षेत्रात – 45